आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

स्वागत दिवाळी अंकाचे

स्वागत दिवाळी अंकाचे

छायांकित दिवाळी अंक २०२५ (पोस्टमन)
मराठी साहित्य क्षेत्रात प्रथमच "पोस्टमन" या विशेष व्यक्तिमत्त्वावर आधारित दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. छायांकित दिवाळी अंकाचे संपादन भूषण सहदेव तांबे यांनी शब्द शंकरपाळी प्रकाशनातर्फे केले आहे. कथा, कविता, लेख, कला आणि मनोरंजन अशा पाच विभागात दिवाळी अंक तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे टपाल कार्यालयाचे सर्वोच्च अधिकारी माननीय अमिताभ सिंह, कामगार नेते माननीय अभिजित राणे, माननीय खासदार डॉ. निलेश लंके यांनी या दिवाळी अंकाचे कौतुक करून शुभेच्छा पत्र दिले आहे. 

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून, गोवा, गुजरात, राजस्थान, तसेच अमेरिकेतून मराठी भाषिक साहित्यिकांनी या दिवाळी अंकात सहभाग नोंदविला आहे. राजश्री भावार्थी, प्राजक्ता खेडेकर, गौरी कुलकर्णी, रसिका तुपे, प्रज्ञा वझे, हेमलता निगडे यांच्या कथा, निशा काळे, शिवाजी जाधव, कविता मोरवणकर यांच्या कविता मृगनयना भजगवरे यांची लावणी, पल्लवी येवले आणि युवराज्ञी सोनवणे यांचा पोवाडा, प्रदीप बडदे आणि बबन धुमाळ यांच्या गजला, सरोज गाजरे, लक्ष्मी यादव यांचे लेख, राघवेंद्र वंजारी यांचे विनोद, अंकिता चव्हाण, अरविंद झाडे आणि गौतम दिवार यांच्या चित्रकला, शलाका कोठावदे, सारंग सबनीस यांचे मनोरंजन, काशीराम खरडे यांची व्यंगचित्रकला तर विघ्नेश पाष्टे यांची ग्राफिक्स डिझायनिंग या दिवाळी अंकाचे विशेष आकर्षण ठरले आहे आणि अशा विविध मान्यवरांच्या योगदानाने हा अंक तयार होऊन लोकार्पणास सज्ज झाला आहे.

 संपादक: भूषण सहदेव तांबे
 पाने: १३२
 मूल्य: रु.३००/-

दृष्टीकोन आजही संकुचितच !

नवी मुंबई : या कुष्ठरोग निवारण समितीच्या इस्पितळात अनेक वर्षे रुग्ण राहिल्यावरही त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन हा कलुषितच असून अनेकदा त्यांच्या नातेवाईकांनीही या रुग्णांशी संबंध तोडल्याचे आढळत असल्याची खंत शांतिवन, नेरे, पनवेल येथील या समितीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद ठाकूर यांनी व्यक्त केली. ‘श्री गजानन महाराज भवत मंडळ, वाशी’ तसेच ‘युथ कौन्सिल नेरुळ’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने १९ ऑक्टोबरला आयोजित दिवाळी फराळ वाटप व जीवनोपयोगी चीजवस्तूंच्या वितरण, दिवाळी अंक तसेच ब्रेल लिपीतील पुस्तकांच्या प्रकाशन प्रसंगी ठाकूर बोलत होते.
     या वेळी विचारमंचावर पनवेलचे ज्येष्ठ कन्सल्टिंग सर्जन डॉ.अरुण रानडे, ब्रेल पुस्तकांचे लेखक व दै. ‘आपलं नवे शहर’चे उपसंपादक राजेंद्र घरत, आर सी एफच्या मुख्य महाव्यवस्थापक नंदा कुलकर्णी, ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ संस्थेचे संस्थापक गणेश हिरवे, ‘ज्येष्ठ नागरिक संघा’च्या रुग्णसेवा केंद्राचे अध्यक्ष रणजीत दिक्षित, ‘श्री गजानन महाराज भक्त मंडळा’चे उपाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, पत्रकार वैभव पाटील हे उपस्थित होते. १२२ एकरात पसरलेल्या या ‘कुष्ठरोग निवारण समिती’च्या कामाला योग्य ते सरकारी पाठबळ मिळत नाही तसेच या जागेवर अनेकांचा डोळा असून कदाचित त्या जागेच्या रक्षणासाठी भविष्यात संघर्ष करावा लागेल असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी ‘जॉय’ या वैभव पाटील व गणेश हिरवे संपादित दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. दै. ‘आपलं नवे शहर’चे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी लिहिलेल्या ‘दृष्टीआड सृष्टी’ आणि ‘शाली आणि माली’ या ब्रेल लिपीतील त्यांच्या एकोणतिसाव्या व तिसाव्या पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी पार पडले. शरीराचा कुष्ठरोग एकवेळ औषधांनी बरा होईल; प़ण मनाच्या कुष्ठरोगाचे काय करणार? असा प्रश्न यावेळी केलेल्या भाषणात उपस्थित करुन लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये चोर, डाकू, दरोडेखोर, लुटारु, भामटे बिनबोभाट प्रवास करतात; मात्र कुष्ठरोग्यांकडे मात्र अशा प्रवासात तिरस्कृत नजरेने पाहिले जाते असे सांगत आपल्या डोळ्यावर अलीकडेच करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेचा संदर्भ देत घरत म्हणाले की अंधांना किती व कसकशा समस्यांना सामोरे जावे लागते त्याचा अंशतः अनुभव आपल्याला त्यानंतरच्या काळात घेता आला. ब्रेल लिपीतील पुस्तकांसाठी लेखन करताना तो उपयोगी ठरल्याचेही त्यांनी नमूद केले. वृध्दाश्रम व अनाथाश्रम हे जवळजवळ असावेत; जेणेकरुन वृध्दांना नातवंडांच्या भेटीचा आनंद घेता येईल अशी अपेक्षा यावेळी ज्येष्ठ सर्जन डॉ.अरुण रानडे यांनी व्यक्त केली. कट, कमिशनच्या प्रस्थापित रचनेत आपण बसत नसल्याने २७ वर्षे चालवलेले हॉस्पिटल बंद करुन अन्य पर्याय अवलंबले असल्याचे सांगून डॉ. रानडे म्हणाले की बालकांना चांगल्या, सत्वयुक्त अन्नापेक्षा चटपटीत, आजारांना कारण ठरणारे अन्न खाण्याची सवय लागली आहे, ती तोडायला हवी. यावेळी डॉ. रानडे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. नंदा कुलकर्णी यांनी त्यांनी हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
विजय दाजी सावंत व रमेश सुर्वे या सदस्यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच रणजीत दिक्षित यांचा रुग्णसेवेबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि नेटके सूत्रसंचालन युथ कौन्सिल, नेरूळ’चे सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी केले. गजानन महाराज भक्त मंडळाचे उपाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमानंतर तिथेच युथ कौन्सिल नेरुळ या संस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साही वातावरणात पार पडली. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री दत्ताराम आंब्रे, अशोकराव महाजन, जी. आर. पाटील, रवींद्र कांबळे, अंकुश शिंदे, दिलीप चिंचोळे, विक्रम राम, गोपाळ शिंदे, यशवंत गोणेवाड आदींनी खूप मेहनत घेतली.

सुनिर्मल फाऊंडेशनच्या वतीने अनाथ आणि गरजूना दिवाळी फराळ वाटप!

मुंबई (प्रतिनिधी)सुनिर्मल फाऊंडेशन हि धारावीतील प्रतिष्ठित अशी फाऊंडेशन असून धारावीतील गरीब आणि गरजूच्या मदतीसाठी सतत कार्यरत असते.धारावीशिवाय सुनिर्मल फाऊंडेशन आपल्या कार्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.म्हणूनच "एक दिवाळी आदिवासी आणि बेघर मुलासोबत गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे.
     यावर्षी सुद्धा सुनिर्मल फाऊंडेशनच्या वतीने ठाणे येथील जीवन संवर्धन या संस्थेत राहत असणाऱ्या अनाथ आणि बेघर मुलीं सोबत फराळ वाटून दिवाळी साजरी केली.यावेळी शब्दश्री विलास देवळेकर यांनी दीपावली वर आपली कविता सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले.सुनिर्मल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी फराळ वाटप करण्यासाठी दत्ता खंदारे, परशुराम गजाकोष,राम म्हस्के,ओमकार खंदारे,प्रदीप खंदारे, भावेश खंदारे, मंगेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्यां सौ श्रद्धा तेंडुलकर, सामाजिक कार्यकर्त्यां पुनम जगताप,प्रेरणा खंदारे,वैष्णवी खंदारे,पत्रकार दिलीप शेडगे, पत्रकार शशिकांत सावंत, साहित्यिक विलास देवळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच जीवन संवर्धन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

भांडूपगावात किल्ला स्पर्धेचे आयोजन

मुंबई (प्रतिनिधी): सार्वजनिक पूजा समिती, भांडूपगाव या संस्थेतर्फे प्रतिवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या संस्थेचे ७६ वे वर्षे आहे. या दीपोत्सवाच्या निमित्ताने किल्ला स्पर्धा भांडूपगाव येथे घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष परशुराम कोपरकर यांच्या संकल्पनेतुन लहान मुलांमध्ये ऐतिहासिक मूल्यांची जपणूक व्हावी, या हेतूने किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे परीक्षण जयकांत शिखरे, जगदीश धनमेहेर यांनी केले.
      स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव धनंजय म्हात्रे, कार्याध्यक्षा रजनी पाटील, खजिनदार महेश पाटील, उत्सव समितीच्या अध्यक्षा ममता उलवेकर, सचिव दिनेश कोपरकर तसेच महेश कोपरकर, महेंद्र कुरकुटे, वर्षा वाघिलकर, सोनम कोपरकर, सरिता म्हात्रे, उमा मळेकर, उषा काकडे, प्रवीण पवार, डॉ. देविदास केनी, हेमा भोईर, स्मिता मिसाळ, सृष्टी वाघीलकर,विजय कडव, प्रशांत काकडे, हेमंत वाघिलकर, सिद्देश वायगंकर, भारती किनी,दिनेश कोपरकर, संजय उलवेकर, प्रविण पवार, दयानंद पवार, प्रमिला कोपरकर, राहुल खराटे, रजनी पाटील, सृष्टी वाघिलकर, वर्षा वाघिलकर, दीपाली पाटील, सरिता म्हात्रे, भारती किनी, चारुशीला पाटील, विशाखा भोईर, राजेंद्र गावकर, पल्लवी खारकर, प्रमिला कोपरकर, स्मिता मिसाळ, आदि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यांसमोर ठेवून युवकांची ऑफिस मधील दिवाळी

नवी मुंबई (दिव्या पाटील): भारतभर सर्वत्र दिवाळी सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. तसेच ऑफिस मध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांना वेगवेगळे उपहार बोनस देत कंपनीच्या माध्यमातून दिवाळी दर वर्षी साजरी होत असते. दिवाळीची सजावट देखील तशी साजरी केली जाते. नवी मुंबईतील एका कॉर्पोरेट कंपनीत यंदा शिवाजी महाराजांचा इतिहास आठवत त्यांना आदरांजली म्हणून दिवाळीची आरास रचण्यात आली आहे. ‘डायलो’ कंपनीच्या माध्यमातून दिवाळीची सजावट स्पर्धा करण्यात आली होती. तेथील कर्मचाऱ्यांनी एकत्रित पणे येऊन ही आरास रचली आहे. ‘ दिवाळी सण हा फक्त सण नसून शिवछत्रपतींच दिलेल देणं आहे‘ असा संदेश युवकांनी दिला आहे.

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या हस्ते ‘धगधगती मुंबई’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

परळ (प्रतिनिधी)सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम म्हणून ‘धगधगती मुंबई’ या वृत्तपत्राच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन परळ येथील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट येथे एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. या वेळी विशेषांकाचे प्रकाशन टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या हस्ते करण्यात आले.
   परळ येथील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टमध्ये बाहेरगावावरून आलेले अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचार काळात वास्तव्य करतात. त्यांच्या जीवनात थोडासा आनंदाचा क्षण निर्माण करण्यासाठी ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राच्या टीमने हा उपक्रम राबविला. प्रकाशन सोहळ्यानंतर रुग्णांना दिवाळी विशेषांकाचे वाटप,तसेच लाडू वाटप करण्यात आले तसेच छोटीशी आर्थिक मदत देऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
      या प्रसंगी माहीम विधानसभा निरीक्षक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) यशवंत विचले, ज्येष्ठ पत्रकार प्रा. हेमंत सामंत, तसेच ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
     रुग्णांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन ही कल्पना उपस्थित मान्यवरांनी कौतुकास्पद ठरवली. समाजातील दुर्बल घटकांना आनंदाचे क्षण देणाऱ्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र ‘धगधगती मुंबई’च्या टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे.

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप ;विद्यार्थ्यांची दिवाळी झाली गोड !!

उरण  (विठ्ठल ममताबादे) सन २०२२ साली सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेची स्थापना झाली. जेव्हा पासून या संस्थेची स्थापना झाली तेव्हा पासून अनेक विविध लोकोप‌योगी उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आले. या संस्थेने गोरगरिबांना नेहमी मदतीचा हात दिला आहे.अशा या कुणाल पाटील यूवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळी सण जवळ आला की विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळाचे वाटप केले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाही संस्थेच्या माध्यमातून पागोटे ग्रामपंचायतचे कार्यसम्राट सरपंच तथा कुणाल पाटील यूवा सामाजिक संस्थेचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील पागोटे गावातील जिल्हा परिषद शाळा,नवघर जिल्हा परिषद शाळा,कुंडेगाव जि.प.शाळा, उरण शहरातील बोरी येथे असलेल्या स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान सिबर्ड उरण विशेष मुलांची शाळा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटपाचे यंदाचे हे ३ रे वर्ष आहे. शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. समाजातील उपेक्षित, वंचित समाजाची दिवाळी आनंदात जावी. त्यांच्या या सुख दुःखात सहभागी होउन त्यांच्या सोबत दिवाळी सण आनंदात साजरा करता यावी या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप करण्यात येत असल्याची माहिती कार्यसम्राट सरपंच कुणाल पाटील (संस्थापक कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटे ) यांनी दिली. या कार्यक्रम प्रसंगी कार्यसम्राट सरपंच कुणाल पाटील,संस्थेचे पदाधिकारी महेश पाटील, विनय पाटील, प्रणय पाटील, ऋषिकेश म्हात्रे, प्रथम तांडेल, ऋषिकेश पाटील, नकुल पाटील, अमित पाटील, रोशन म्हात्रे, दर्शन म्हात्रे, आकाश म्हात्रे, सुमित पाटील, राज पाटील (फोटोग्राफर ), ज्योतेश पाटील, आतिष पाटील यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व उत्तम आयोजन असल्याने विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी वर्गांनी कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेच्या कार्याचे, पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

स्वागत दिवाळी अंकाचे

स्वागत दिवाळी अंकाचे छायांकित दिवाळी अंक २०२५ (पोस्टमन) मराठी साहित्य क्षेत्रात प्रथमच "पोस्टमन" या विशेष व्यक्तिमत्त्...